दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर एक्सप्रेसला मंजुरी
- by Yogesh Bandagale
- March 18, 2026
- 144 views
मुंबई/रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सेवा कायमची बंद करण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याचवेळी दादर-गोरखपूर रेल्वे सेवेला नियमित एक्सप्रेस म्हणून चालवण्यास मंजुरी देण्यात आल्यामुळे केंद्र सरकारवर कोकणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
केंद्रीय रेल्वे तसेच माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गोरखपूरचे खासदार रवी किशन यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रातून दादर-गोरखपूर ट्रेनला नियमित एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या निर्णयामुळे कोकणवासियांच्या वर्षानुवर्षांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना अधिक तीव्र झाली आहे.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही कोकणातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची सेवा होती. कामगार, विद्यार्थी आणि लहान व्यापाऱ्यांसाठी ही गाडी जीवनवाहिनी मानली जात होती. ही सेवा बंद केल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोकणवासियांनी अनेक वर्षे या गाडीच्या सुरूवातीसाठी आणि नियमिततेसाठी पाठपुरावा केला होता. मात्र आता ती सेवा थेट बंद करून दुसऱ्या राज्यासाठी नवीन एक्सप्रेस सुरू करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “कोकणाला डावलून उत्तर प्रदेशला प्राधान्य दिले जात आहे का?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या निर्णयाचा फेरविचार करून दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी कोकणातील नागरिक, प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून जोर धरत आहे.
