तीन सख्खे भाऊ एमपीएससीत यशस्वी
- by Yogesh Bandagale
- December 19, 2025
- 161 views
अहिल्यानगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्दीला सलाम करणारी एक प्रेरणादायी यशोगाथा अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील चंदन कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय सेवेत स्थान मिळवले आहे. एकाच कुटुंबातील तीन भाऊ अधिकारी होण्याचे हे उदाहरण महाराष्ट्रात दुर्मिळ मानले जात आहे.
उखलगावसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागातून शिक्षण घेत अजय चंदन यांनी एमपीएससी संयुक्त गट-ब २०२४ परीक्षेत यश संपादन करत राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदाला गवसणी घातली आहे. जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेऊन अधिकारीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
चंदन कुटुंबातील मोठे भाऊ दिलीप मालन चंदन हे सध्या नागपूर गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर दुसरे भाऊ विजय मालन चंदन पुणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे दोघेही सुरुवातीला शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्धार करत त्यांनी आपले ध्येय गाठले.
अजय चंदन यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उखलगाव येथून पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. दोन मोठ्या भावांचा आदर्श, आई-वडिलांचा संघर्ष आणि स्वतःची चिकाटी याच्या बळावर त्यांनी एमपीएससीचा कठीण प्रवास यशस्वी केला.
या तिन्ही भावांच्या यशामुळे उखलगाव गावालाही मोठी प्रेरणा मिळाली आहे. दिलीप चंदन अधिकारी झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनातून गावातील सुमारे १५ तरुणांनी विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत अधिकारीपद मिळवले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. केवळ स्वतःपुरते यश न ठेवता, गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य चंदन बंधू सातत्याने करत आहेत.
या यशाबद्दल बोलताना अजय चंदन म्हणाले, “या यशामागे माझी आई, भाऊ, कुटुंबीय आणि मित्रांचा मोठा वाटा आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य, जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजन अत्यंत आवश्यक आहे.”
ग्रामीण भागातून आलेल्या चंदन बंधूंची ही एमपीएससी यशोगाथा आज संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
