डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे वडील अच्युत आठल्ये यांचे मरणोत्तर देहदान
- by Yogesh Bandagale
- January 29, 2026
- 82 views
रत्नागिरी, दि. 29 (जिमाका) : गुरुराज हाऊसिंग सोसायटी, उद्यमनगर येथील दिवंगत अच्युत शिवराम आठल्ये (वय ८९ वर्षे) यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. कै. आठल्ये यांचा २७ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हा देहदान २८ जानेवारी रोजी पार पडला.
कै. अच्युत आठल्ये हे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे वडील होते, तर त्यांची सून डॉ. रश्मी आठल्ये शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हा महाविद्यालयातील १७ वा मरणोत्तर देहदान ठरला.
अच्युत आठल्ये यांचा जन्म १३ जुलै १९३७ रोजी लांजा तालुक्यातील शिपोशी येथे झाला. त्यांनी एल.आय.सी. मध्ये सलग ४० वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. वाचनाची आवड, समाजकार्य, साधे जीवन आणि विचारशील व्यक्तिमत्त्व हे त्यांचे वैशिष्ट्य होते. या देहदानातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळणार असून, त्यांचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरतो.
देहदान प्रसंगी कै. अच्युत आठल्ये यांची मुलगी, जावई, नातेवाईक तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे, जिल्हा परिषद रत्नागिरीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही संपूर्ण प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव आणि विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, राज पेडणेकर व श्रेयस जोशी यांनी प्रक्रियेत सहकार्य केले.
