डीबीजेच्या एनएसएस स्वयंसेवकांचा वनराई बंधारा बांधून जलसंवर्धनाचा संदेश
- by Yogesh Bandagale
- December 02, 2025
- 80 views
चिपळूण : येथील डी.बी.जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबिरामध्ये सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण साकारले गेले. मौजे चिंचघरी (गणेशवाडी) येथे सुरू असलेल्या या शिबिरादरम्यान एनएसएस स्वयंसेवकांनी २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयाजवळील नदीवर ५४ फूट लांबीचा वनराई बंधारा बांधून जलसंवर्धनाचा आणि जलसुरक्षेचा प्रभावी संदेश दिला.
दोन दिवस अखंड परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांनी उभारलेला हा बंधारा पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये साठलेले पाणी पाहून ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या श्रमाचे मनापासून कौतुक केले. पाणी हा जीवनाचा गाभा असून त्याचा तुटवडा वाढत चालला आहे; अशा परिस्थितीत तरुणांनी प्रत्यक्ष कृतीतून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
शिबिरादरम्यान विद्यार्थी पथनाट्य सादर करूनही ‘जलसुरक्षा आणि जलसंवर्धन’ हा संदेश गावागावात पोहोचवत आहेत. बंधारा बांधण्याच्या कामातून त्यांनी कृतीतून दिलेला संदेश अधिक प्रभावी ठरला.
या उपक्रमाला चिंचघरी ग्रामपंचायतीकडून मोठा प्रतिसाद मिळाला. सरपंच सौ. अनिता गुरव, उपसरपंच सौ. दिक्षिता चाळके, माजी उपसरपंच राजेश चाळके, तसेच एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मीकांत पाटील, प्रा. विश्वंभर कमळकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनीही या कार्याची प्रशंसा केली.
या वेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. अविनाश पालशेतकर, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. प्रदीप वळवी, सल्लागार प्रा. अरुण जाधव, प्रा. विठ्ठल कोकणी, राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेजर नम्रता माने आणि एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते. सर्व स्वयंसेवकांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांमुळे हा बंधारा यशस्वीरीत्या उभारता आला.
