ज्येष्ठ नागरिकांसाठी अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Yogesh Bandagale
- January 05, 2026
- 285 views
चिपळूण नाट्य परिषदेचे आयोजन; रश्मी मोरे प्रथम
चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत २०हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकपात्री अभिनय स्पर्धेत रश्मी मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर द्विपात्री अभिनय स्पर्धेत रंजना सावंत व रश्मी मोरे या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कडवई येथील सिने-नाट्य कलाकार डॉ. भगवान नारकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप आंब्रे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे उद्घाटन परीक्षक, नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष योगेश बांडागळे, नगरसेविका अंजली कदम आणि अभिनय स्पर्धेच्या प्रमुख अॅड. विभावरी रजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन संगीता जोशी यांनी केले.
प्रास्ताविक करताना उपाध्यक्ष योगेश बांडागळे यांनी गेल्या दोन वर्षांत कोकणातील कोणत्याही नाट्य परिषद शाखेने राबवले नसतील इतके उपक्रम चिपळूण शाखेने यशस्वीपणे राबवले असल्याचे नमूद केले. शालेय व खुल्या गटापुरत्या मर्यादित न राहता केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी अभिनय स्पर्धा घेण्याचा संकल्प अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केला असून तो यशस्वी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षक डॉ. भगवान नारकर यांनी सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन करत साठीनंतरही आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.
एकपात्री गटात रश्मी मोरे प्रथम, पुष्पावती पाटील द्वितीय, अनिल सोमण तृतीय ठरले. संगीता पालकर व शोभा वाडकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
द्विपात्री गटात रंजना सावंत व रश्मी मोरे प्रथम, सुनीत्र आपटे व संजय शिंदे द्वितीय, अभय दांडेकर व भालचंद्र कदम तृतीय ठरले. स्नेहल दीक्षित व मेघना चितळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. नेत्रा आपटे यांना परीक्षक डॉ. भगवान नारकर यांच्या हस्ते विशेष अभिनय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
बक्षीस समारंभाला नगरसेवक कपिल शिर्के, नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेवक निहार कोवळे, परीक्षक डॉ. भगवान नारकर, अभिनय स्पर्धेच्या प्रमुख अॅड. विभावरी रजपूत आणि नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष योगेश बांडागळे उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा दामले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव डॉ. मीनल ओक यांनी केले.
कार्यक्रमाला डॉ. मधुकर जोशी, शिवसेना महिला शहर प्रमुख प्राजक्ता टकले, युनायटेडचे शिक्षक मंगेश खेडेकर, भाजपचे नरेंद्र बेलवलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने पुष्पावती पाटील यांनी मनोगत व्यक्त करत या स्पर्धेमुळे मनोधैर्य वाढल्याचे सांगून नाट्य परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकांत पाठक, योगेश कुष्टे, छाया पोटे, प्राची गोखले यांच्यासह नाट्य परिषदेच्या सर्व संचालक सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
फोटो कॅप्शन :
यशस्वी स्पर्धकांना गौरवताना अॅड. मीनल ओक यांच्यासोबत परीक्षक भगवान नारकर, नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेवक कपिल शिर्के, अॅड. विभावरी रजपूत, छाया पोटे, नगरसेवक निहार कोवळे, उपाध्यक्ष योगेश बांडागळे आणि मनीषा दामले.
