जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामावरून पालकमंत्र्यांची नाराजी
- by Yogesh Bandagale
- October 01, 2025
- 158 views
रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमिपूजन १२ वर्षांपूर्वी झाले असून एमआयडीसीने त्यासाठी १४ एकर जागा दिली तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाने १० कोटी ५० लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले. तरीदेखील क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झाले नाही. याबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, प्रांताधिकारी जीवन देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एस. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, “जिल्हा क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. ठेकेदार काम करत नसेल, तर त्याला काळ्या यादीत टाकावे. कोणत्याही परिस्थितीत काम तातडीने पूर्ण व्हावे.” तसेच बॅडमिंटन सभागृहाच्या फ्लोरिंग संदर्भातील निविदा प्रक्रिया जिल्हा क्रीडा कार्यालयाने पूर्ण करावी आणि लांजा तालुका क्रीडा संकुलासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव द्यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सर्व तालुक्यांच्या क्रीडा संकुलांचा आढावा घेण्यात आला.
कलावंताच्या अर्जांची छाननी करण्याच्या सूचना
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी आलेल्या अर्जांपैकी कलाकारांची निवड करण्यासाठी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत पालकमंत्री डॉ. सामंत यांनी समिती सदस्यांना शासनाच्या निकषानुसार तालुकानिहाय छाननी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांनी अर्जांविषयी सविस्तर माहिती दिली.
शहरातील स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश
रत्नागिरी नगरपरिषदेने शहरातील स्वच्छतेवर अधिक भर द्यावा, असेही डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी व शहराच्या सौंदर्यात बाधा आणणारी होर्डिंग्ज दिसत असून ती तात्काळ हटवावी. तसेच कचरा निर्मूलन करून शहर स्वच्छ व नीटनेटके ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेताना मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सद्यस्थितीची माहिती दिली. पालकमंत्र्यांनी काळबादेवी पुलासंदर्भात बैठक घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली व सर्वसमावेशक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
