जिजाऊ ब्रिगेड रत्नागिरीत गरजू महिलांसाठी विनामूल्य कायदेशीर सल्ला सेवा सुरू
- by Yogesh Bandagale
- December 24, 2025
- 169 views
रत्नागिरी (प्रतिनिधी) : गरजू महिलांना कायदेशीर मार्गदर्शन आणि मानसिक आधार मिळवून देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड रत्नागिरीत नवीन उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, ऍडव्होकेट वृषाली सावंत यांना “जिल्हा कायदेशीर सल्लागार” म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ऍड. वृषाली सावंत ही एक नामवंत वकील असून, सायकॉलॉजी कौन्सलर आणि कोकण कन्या फाऊंडेशनच्या संचालिका देखील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यातील महिलांना कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर सल्ला, दाद घेण्यासाठी करावयाच्या कृती आणि मानसिक आधार मिळणार आहे.
जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण यांनी सांगितले की, “ऍड. वृषाली सावंत यांनी सामाजिक कार्यात महिलांसाठी अनेक मार्गदर्शक शिबिरे व प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ घेत गरजू महिलांना योग्य सल्ला व सहाय्य मिळेल.”
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये पूर्वा तांदळे (जिल्हा सचिव), रोहिणी मोरे (खेड तालुका अध्यक्ष), वर्षा खटके (शहर अध्यक्ष), अपूर्वा गायकवाड (उपशहर अध्यक्ष), जया मोरे आणि इतर महिला सदस्य उपस्थित होत्या. सर्व उपस्थितांनी ऍड. वृषाली सावंत यांचे स्वागत आणि अभिनंदन केले.
जिल्ह्यातील सर्व महिलांना या विनामूल्य कायदेशीर सल्ला आणि समुपदेशन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
