छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय स्मारकासाठी ३०० कोटींचा निधीची मागणी

चिपळूण, दि. २५ (प्रतिनिधी): आमदार शेखर निकम यांनी संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास फक्त स्थानिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि हिंदवी स्वराज्याचा अमूल्य वारसा आहे. येथे छत्रपती संभाजी महाराजांनी केलेले कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व जतन करणे आवश्यक आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय उपस्थित करून संवाद साधला गेला होता, असे आमदार निकम यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी यांनी प्रस्तावित स्मारकासाठी ३१३ कोटींचा आराखडा तयार करून शासनास सादर केला आहे. सुमारे ५ एकर वास्तविक जागा व नियोजित १०० एकर परिसर संपादित करून येथे भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक उभारणे हे कोकणातील जनतेच्या अपेक्षांनुसार आहे.

आमदारांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी २७ एप्रिल २०२५ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सकारात्मक भूमिका दर्शवली होती. त्याला आता १ वर्ष पूर्ण होणार असून, या स्मारकाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून येणे स्वर्गीय अजितदादा पवार यांची मनापासून इच्छा होती.

निवेदनात पुढे सुचवले आहे की, शास्त्रीपुल ते शृंगारपूर या ऐतिहासिक मार्गाचा सर्वांगीण विकास करावा, कारण शृंगारपूर ही छत्रपती संभाजी महाराजांची सासरवाडी असून या मार्गावर मालोची राजे घोरपडे कारभाटले यांची समाधीही आहे. तसेच कसबा परिसरातील सुमारे ३०० पुरातन मंदिरे एकात्मिक विकास आराखड्यानुसार विकसित केली जातील, तर सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरेल.

यासोबत शास्त्री नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने ६६ कोटी २२ लाख ७३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून, आगामी अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये दोन्ही प्रस्तावित आराखड्यांना मान्यता देऊन आवश्यक निधीची तरतूद करावी, असे आमदार शेखर निकम यांनी नमूद केले.

या वेळी सोबत आमदार संग्रामभैया जगताप, आमदार सुनील शेळके, आमदार संजय खोडके, माजी आमदार राजेश पाटील, तसेच देवेंद्र भुयार व प्रकाश आजबे उपस्थित होते.

संबंधित लेख