चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे ‘चिपळूण सायक्लोथॉन -२०२५’ चे आयोजन
- by Yogesh Bandagale
- December 19, 2025
- 59 views
चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सलग पाचव्या वर्षी ‘चिपळूण सायक्लोथॉन – 2025’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सायक्लोथॉन गुरुवार, दि. 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 6.00 वाजता होणार असून, सायकल राईडची सुरुवात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथून होईल.
हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांपासून ते सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांसाठी खुला असून, सायकलिंगद्वारे नियमित व्यायामाची सवय लागावी, आरोग्याबाबत जागरूकता वाढावी तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश समाजात पोहोचावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सायकलवरून निसर्ग अगदी जवळून अनुभवता येत असल्याने आउटडोअर सायकलिंगमधून निखळ आनंद मिळतो. एकदा घेतलेला हा अनुभव पुन्हा-पुन्हा घ्यावा असे वाटते आणि आपोआपच नियमित आउटडोअर सायकलिंगची सवय लागते. हा अनुभव या निमित्ताने सहभागी सायकलिस्टना देता येईल तसेच समान विचारांच्या व समउद्देशीय सायकलिस्ट्सचा समुदाय देखील मिळतो या अनेकविध हेतुपुरस्सर निसर्गरम्य व आकर्षक मार्गांवरून या सायकल राईड चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सायक्लोथॉन मध्ये सायकल राईडचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल :
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र → एम. के. थिएटर → पटेल प्लाझा → भेंडी नाका → उक्ताड → गोवळकोट कमान → लंडन रोड → गोवळकोट कमान → एनरॉन ब्रिज → फरशी तिठा → गांधारेश्वर ब्रिज → रामतीर्थ → इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र.
ही सायकल राईड सुमारे १८ किलोमीटर अंतराची आहे
दरवर्षी या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलिस्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, त्याचबरोबर सहभागींची वयोमर्यादाही विस्तारत आहे. मागील वर्षी १० ते ६४ वर्षे या मोठ्या व विस्तृत वयोगटातील सायकलिस्ट्सनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता, ही बाब या सायक्लोथॉनच्या लोकप्रियतेचे द्योतक आहे.
.या सायक्लोथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, आज निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तसेच राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणाऱ्या चिपळूणमधील अनेक नावाजलेल्या व प्रख्यात सायकलिस्ट्सची सायकलिंगमधील वाटचाल याच उपक्रमातून सुरू झाली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नवोदित सायकलिस्ट्ससाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
सायक्लोथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागी सायकल रायडर्सना सन्मानपूर्वक आकर्षक मेडल देण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमादरम्यान सायकलिंगचे फायदे, सायकलिंग स्पर्धांचे प्रकार, तंत्रशुद्ध सायकल चालवण्याची पद्धत, योग्य सायकलची निवड आदी विषयांवर मार्गदर्शनपर माहिती देण्यात येणार आहे
.सालाबादप्रमाणे यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. सहभागासाठी नोंदणी आवश्यक असून प्रवेश मर्यादित आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर खालील संकेतस्थळावर नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आले आहे.
? नोंदणी संकेतस्थळ : www.chipluncyclingclub.in
