ताम्हणकरवाडीत किरकोळ कारणावरून हाणामारी; सहा जणांविरोधात गुन्हा
- by Yogesh Bandagale
- September 21, 2025
- 124 views
राजापूर : तालुक्यातील ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीच्या प्रकरणी सहा जणांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय गोविंद ताम्हणकर यांचा पुतण्या सिद्धेश ताम्हणकर हा मनोहर ताम्हणकर यांच्या घरी गेला असता मनोहर व मनिषा ताम्हणकर यांनी त्याला शिवीगाळ करत दमदाटी केली. या घटनेनंतर फिर्यादी संजय यांचा भाऊ श्रीधर ताम्हणकर, मुलगा साहील ताम्हणकर व पुतण्या संतोष ताम्हणकर घटनास्थळी गेले.
तेथे नामदेव ताम्हणकर, अनिता ताम्हणकर, नंदकुमार ताम्हणकर आणि मंगेश ताम्हणकर यांनी बेकायदेशीर जमाव करून दंगा केला आणि फिर्यादी तसेच साक्षीदार यांना मारहाण केली. यावेळी मनोहर व मनिषा ताम्हणकर यांनी संजय ताम्हणकर यांना "मारून खड्यात पुरून टाकतो" अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी मनोहर ताम्हणकर, मनिषा ताम्हणकर, नामदेव ताम्हणकर, अनिता ताम्हणकर, नंदकुमार ताम्हणकर व मंगेश ताम्हणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.
