चिपळूण नगर परिषदेत 'सायकल दिवस' उपक्रम
- by Yogesh Bandagale
- October 01, 2025
- 313 views
चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या 'माझी वसुंधरा अभियान 6.0' अंतर्गत चिपळूण नगर परिषद मार्फत पर्यावरणपूरक जीवनशैलीस प्रोत्साहन देण्यासाठी दर महिन्याच्या 1 तारखेला आयोजित केला जाणारा ‘सायकल दिवस’ उपक्रम आज (१ ऑक्टोबर) उत्साहात पार पडला.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 'वायू' कृतीबिंदू अंतर्गत नागरिकांना सायकलचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या दिवशी सर्व नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनी खाजगी वाहनांचा वापर टाळून सायकल किंवा पायी नगर परिषद कार्यालयात हजेरी लावली.
उपक्रमाची सुरुवात आज सकाळी 8 वाजता करण्यात आली. 'स्ट्रावा' या मोबाईल अॅपद्वारे चिपळूण नगर परिषद क्लब जॉइन करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व माहिती देण्याचे काम अभियान समन्वयक सुरज सकपाळ यांनी केले.
या उपक्रमात नियमितपणे शाळेत सायकलने येणाऱ्या सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता १० वी अ चा विद्यार्थी प्रेम सचिन चोरगे याला मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते 'माझी वसुंधरा मित्र' प्रमाणपत्र आणि फुलाचे रोपटे देऊन गौरविण्यात आले.
यानंतर सर्व सायकलस्वारांनी चिपळूण नगर परिषद कार्यालय येथून निघून बाजारपेठ रोड - गांधी चौक - नाथपै चौक - नवीन मटण मार्केट - खेडेकर संकुल मार्गे फेरफटका मारून परत कार्यालयात सांगता केली. यामध्ये अनेक नागरिक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी पायी चालत सहभागी झाले.
हा उपक्रम मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, उद्यान विभाग प्रमुख व माझी वसुंधरा अभियान नोडल अधिकारी प्रसाद साडविलकर, तसेच इतर नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.
