चिपळूण तालुक्यात मतदानादरम्यान तोंडली येथे 68 हजारांची रोख रक्कम जप्त
- by Yogesh Bandagale
- February 07, 2026
- 304 views
चिपळूण : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना तोंडली येथे भरारी पथकाने 68 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.
चिपळूण तालुक्यात निवडणूक प्रक्रिया एकूणच शांततेत पार पडत असताना तोंडली येथे एका घरात पैसे वाटप होत असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर भरारी पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
या कारवाईदरम्यान सुभाष जाधव यांच्याकडे 18 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. तसेच त्याच ठिकाणी आणखी 50 हजार रुपये सापडले. मात्र ही 50 हजार रुपयांची रक्कम नेमकी कोणाची आहे, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.
एकूणच भरारी पथकाने तोंडली येथे 68 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेचा अपवाद वगळता चिपळूण तालुक्यात सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे निवडणूक प्रशासनाने सांगितले.
