चिपळूणहून शिवसेनेचा प्रचारात सक्रिय सहभाग
- by Yogesh Bandagale
- January 13, 2026
- 146 views
मुंबई : सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या, कोणताही राजकीय वारसा किंवा सत्तेचा आधार नसताना केवळ निष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिवसेनेची विचारधारा यावर ठाम उभ्या असलेल्या उच्चशिक्षित कुमारी धनश्री विलास कोलगे या मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये वार्ड क्रमांक २, दहिसर येथून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
धनश्री कोलगे यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण तालुकाप्रमुख श्री. बळीराम गुजर, उपतालुकाप्रमुख श्री. सचिन शेट्ये, चिपळूण उपतालुकाप्रमुख श्री. नैनेश उर्फ राजाभाऊ नारकर, विभागप्रमुख श्री. अजित गुजर तसेच श्री. गौरेश कोलगे हे पदाधिकारी थेट चिपळूणहून मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हे सर्व नेते व पदाधिकारी प्रत्यक्ष प्रचारफेरीत सहभागी होत मतदारांशी संवाद साधत असून धनश्री कोलगे यांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.
चिपळूण उपतालुकाप्रमुख श्री. नैनेश उर्फ राजाभाऊ नारकर हे उमेदवार धनश्री कोलगे यांचे काका असून त्यांचे मूळगाव चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली आहे. त्यामुळे कोकणातील शिवसैनिकांचा या प्रचाराला विशेष पाठिंबा लाभत आहे.
यावेळी तालुकाप्रमुख श्री. बळीराम गुजर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आजही निष्ठावंतांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. राजकारण जर सेवा नसेल तर ते सत्तेची दलालगिरी ठरते. निष्ठा आणि प्रामाणिकपणाने लढणाऱ्या धनश्री कोलगे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत. भाजपची घरफोडीची वृत्ती, समाजात तेढ निर्माण करण्याचे राजकारण याचा पराभव करण्यासाठीच ही लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि मराठी माणूस अशा प्रवृत्तीविरोधात उभा राहू शकतो, हे आम्ही दाखवून देऊ.”
याचवेळी चिपळूण तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना आवाहन करण्यात आले की, ज्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट किंवा मित्रपरिवार मुंबईत वास्तव्यास आहेत, त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून प्रभाग क्रमांक २, दहिसर येथील मशाल चिन्हावरील उमेदवार कुमारी धनश्री विलास कोलगे यांना मतदान करून विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत. “मशाल चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेनेच्या निष्ठावंत उमेदवाराला विजयी करा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.
