चिपळूणमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पालखी आगमनाने भक्तिमय वातावरण
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 95 views
चिपळूण : परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या देहदुर्लभ चांदीच्या पादुका, पालखी आणि चैत्रनवमी महोत्सवानिमित्त चिपळूण शहरात काल रविवारी सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात आणि स्वामीनामाच्या जयघोषात पालखीचे आगमन झाले. आगमनावेळी शहरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
सायंकाळपासूनच शहरातील वेस मारुती मंदिर परिसरात पालखी विराजमान झाली होती. तेथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. पालखी आगमनानंतर पूजन व स्वागत विधी पार पडले. त्यानंतर मठ ते वेस मारुती मंदिरापर्यंत टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि स्वामीनामाच्या जयघोषात भव्य दिंडी काढण्यात आली. मंदिर प्रांगणात पालखी आगमन होताच आरती करून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले.
चिपळूण येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज परिवार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही २४ वर्षांपासून स्वामींच्या पालखी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा वेस मारुती मंदिर परिसरात दोन दिवस साजरा होत असून, स्वामींच्या मूर्ती, पादुका आणि पालखीचे भाविकांना दर्शन घेता येत आहे.
आज सोमवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकड आरती, नामस्मरण, स्वामी पाठ, भजन आदी कार्यक्रम पार पडले. दिवसभर भाविकांना दर्शनाची सोय करण्यात आली आहे. उद्या सकाळी पुन्हा धार्मिक विधीनंतर सकाळी आठ वाजता पुढील प्रवासासाठी पालखी रवाना होणार आहे.
दरवर्षी स्वामींच्या पालखी आगमनामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. पालखी आगमनाच्या दिवसापासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून, हा दर्शन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे. सोहळा यशस्वी करण्यासाठी परिवारातील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
