चिपळूणमध्ये कृषी व पशुधन प्रदर्शन ठरले आकर्षणाचे केंद्र
- by Yogesh Bandagale
- January 10, 2026
- 124 views
चिपळूण : चिपळूण येथे आयोजित कृषी व पशुधन प्रदर्शनाने यंदा सर्व विक्रम मोडीत काढत लाखो नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. दिनांक ५ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर प्रशस्त जागेत भरविण्यात आलेले हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले होते. अवघ्या पाच दिवसांत सात लाखांहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार व भाजप नेते डॉ. विनय नातू, भाजप नेते वैभव खेडेकर, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, सतीश मोरे, तसेच वाशिष्ठीचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खा. राणेंकडून प्रशांत यादव यांचे भरभरून कौतुक
स्वास्थ्य ठीक नसतानाही खासदार नारायण राणे यांनी आपल्या भाषणातून कोकणी समाजाला आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. केवळ शिक्षण आणि नोकरी या चौकटीत अडकून न पडता गावांचा विकास हाच खरा विकास आहे, असे सांगत त्यांनी युवकांनी स्वयंरोजगार, शेतीपूरक उद्योग, पशुपालन, दुग्धव्यवसाय, बागायती शेती याकडे वळावे, असे प्रतिपादन केले.
हे प्रदर्शन युवकांना प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार काढत त्यांनी प्रशांत यादव यांच्या धाडसाचे व दूरदृष्टीचे विशेष कौतुक केले.
सर्व एका छताखाली – स्टॉल्सची रेलचेल
प्रदर्शनात महिलांनी तयार केलेले घरगुती पदार्थ, लोणची, सांडगे-पापड, आयुर्वेदिक औषधे, परफ्युम, पुस्तके, शेती अवजारे, पशुखाद्य, विद्युत उपकरणे, खादी व लोकरीपासून बनविलेल्या वस्तू, जाजम, चटया, वाहने आदींचे असंख्य स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच रंगीबेरंगी फुलांची झाडे, फळझाडांची कलमे, शेती विषयक मार्गदर्शन, परिसंवाद व प्रात्यक्षिकांचीही मोठी रेलचेल होती.
पशुधन व पक्ष्यांनी वेधले लक्ष
प्रदर्शनाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या पशुधन विभागात एक हजार किलोहून अधिक वजनाचा ‘सोन्या’ रेडा, मुरा क्रॉसब्रीड म्हशी, विविध जातींच्या गायी, वळू, शेळ्या, उंट, तसेच आशियाई व आखाती देशांतील कोंबड्या, बदके, आफ्रिकन निळा पोपट, दुर्मिळ सरडे आणि बिबट्यासारखे ठिपके असलेल्या मांजरी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
खाऊ गल्ली ठरली आकर्षण
प्रदर्शनाच्या एका स्वतंत्र विभागात उभारलेली खाऊ गल्ली दिवसभर खवय्यांनी फुलून गेली होती. संपूर्ण व्यवस्थापनावर सौ. स्वप्ना यादव स्वतः लक्ष ठेवून होत्या. नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे कुठेही गोंधळ जाणवला नाही.
बैलगाडी शर्यतीतील दिग्गजांची रॉयल एन्ट्री
दररोज बैलगाडी शर्यतीतील नामांकित बैल – बकासुर, मथुर, सर्जा, चिकू यांची मैदानात भव्य एण्ट्री होताच प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारत होता.
स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
प्रदर्शनादरम्यान पाककला स्पर्धा, डॉग शो, कॅट शो, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे, डॉक्टरांचे सल्ला शिबिर आयोजित करण्यात आले. रात्री भजन संध्या, कीर्तन, हरिपाठ, संस्कृती दर्शन कार्यक्रमात गायक अशोक हांडे आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले.
ग्रामीण जीवनाची आठवण
मातीची घरे, गोठे, मचान, कुंभार-लोहारांचे जगणे, तुळशी वृंदावन, अंगण सारवण, बांबूच्या झोपड्या यांमधून कोकणातील ग्रामीण जीवनाचा जिवंत अनुभव नागरिकांना घेता आला.
पुन्हा गोकुळ नांदेल…
शेती, पशुपालन आणि जोडधंद्यांच्या माध्यमातून कोकणातील ओस पडलेले गोठे पुन्हा भरतील, असा आशावाद या प्रदर्शनाने निर्माण केला.
वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव, सौ. स्वप्ना यादव आणि त्यांच्या संपूर्ण टीमने गेल्या तीन वर्षांत हे प्रदर्शन सातत्याने भरवून कोकणातील शेती संस्कृतीला नवा श्वास दिला आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक शब्दात मांडणे अपुरे ठरेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
