चिपळूणच्या सुपुत्राची टांझानियात शाहीन उड्डाण

 

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील गोवळकोट गावाचा अभिमान वाढवणारी बातमी टांझानियातून समोर आली आहे. चिपळूण नगरपरिषद गोवळकोट प्रभागातील माजी नगरसेवक पै. लियाकतभाई चौगुले यांचे सुपुत्र शारीकभाई लियाकत चौगुले यांची टांझानियाची राजधानी दार ए सलाम महानगरपालिकेत नगरसेवकपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शारीकभाई गेली अनेक वर्षे टांझानियातील व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून स्थानिक पातळीवर त्यांनी लोकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे आणि नागरिकांशी सातत्याने ठेवलेल्या संपर्कामुळे दुसऱ्यांदा लोकांचा ठाम विश्वास त्यांना मिळाला.

गोवळकोट गावासाठी ही अत्यंत सन्मानाची आणि उल्लेखनीय घटना ठरत असून "चिपळूणचा सुपुत्र सातासमुद्रापार नाव उज्ज्वल करतोय" अशी भावना ग्रामस्थ तसेच कोकणवासियांनी व्यक्त केली आहे.

यापूर्वीही शारीकभाई यांनी दार ए सलाम महानगरपालिकेत विविध विकासकामांत सक्रिय सहभाग घेत नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. त्यांच्या पुनर्निवडीमुळे स्थानिक मुस्लिम समाजासह कोकणातून टांझानियामध्ये स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

श्री. शारीकभाई चौगुले यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

संबंधित लेख