चिपळूणचे टी.एस. पाटील राज्यस्तरीय “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५”ने सन्मानित
- by Yogesh Bandagale
- September 22, 2025
- 63 views
चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी सती विद्यालयाचे कलाशिक्षक श्री तुकाराम शिवाजी पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. दरवर्षी शिक्षक दिनाच्या औचित्याने ५ सप्टेंबर रोजी राज्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. परंतु यंदा काही तांत्रिक कारणांमुळे पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी टाटा थिएटर, नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (एन.सी.पी.ए.), मुंबई येथे आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री पंकज भोयर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ज. मो. अभ्यंकर, आमदार मनीषा कायंदे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिनंद्र प्रताप सिंह, शिक्षण संचालक महेश पालकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टी.एस. पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले आणि पुरस्कार वितरणाच्या शुभेच्छा दिल्या.
कलाशिक्षक तुकाराम शिवाजी पाटील यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत कला शिक्षण, विद्यार्थ्यांशी संवाद, आणि शाळेतील सर्वांगीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या समर्पित आणि चौफेर कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान केला.
त्यांच्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, जेष्ठ संचालक व चित्रकार-शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर, उपमुख्याध्यापिका सुलोचना जगताप, पर्यवेक्षिका सौ. आसावरी राजेशिर्के, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शालेय समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी टी.एस. पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
हा पुरस्कार शिक्षकांच्या कर्तृत्वाची राज्यस्तरीय दखल असून, त्यांच्या शैक्षणिक सेवेत प्रोत्साहन म्हणून प्रदान केला जातो. टी.एस. पाटील यांच्या कार्यामुळे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्जनशीलता, कला शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या संधी प्राप्त होत आहेत, ज्यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला आहे.
