गुरुकुल, NSS आणि NIC कॅम्पने घडवली कनक मापुस्करची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल
- by Yogesh Bandagale
- January 12, 2026
- 185 views
चिपळूण : योग्य संधी, सकारात्मक वातावरण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर सर्वसाधारण वाटणारी वाटचालही कशी असामान्य बनू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे कनक मापुस्कर हिचा शैक्षणिक व वैयक्तिक प्रवास.
कनक हिने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण चिपळूण येथील प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात घेतले. त्यानंतर पाचवीत तिने परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या नव्याने सुरू झालेल्या गुरुकुल विभागात प्रवेश घेतला. विशेष म्हणजे गुरुकुल विभागाची पहिली नोंदणी केलेली विद्यार्थिनी होण्याचा मान कनकला मिळाला. हाच तिच्या आयुष्यातील पहिला महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला.
गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी साधारण स्वभावाची असलेली कनक, गुरुकुलातील शिस्तबद्ध, मूल्याधिष्ठित आणि पुढाकाराला प्रोत्साहन देणाऱ्या वातावरणामुळे आत्मविश्वासपूर्ण बनली. गुरुकुलातील पहिल्याच दिवशी तिच्या हस्ते गुरुकुल विभागाचे उद्घाटन होणे, हा क्षण तिच्या मनावर खोलवर ठसा उमटवणारा ठरला. “नेहमी पुढे व्हायचे” ही शिकवण गुरुकुलाने तिला प्रत्यक्ष अनुभवातून दिली.
दररोजची सरस्वती पूजाअर्चा, आध्यात्मिकता, कला उपक्रम, रेखाटन, रंगकाम, प्रासंगिक उपक्रम आणि अभ्यास यांचा समतोल साधत कनकने दहावीची तयारी केली. कोणत्याही खाजगी शिकवणीशिवाय, गुरुकुलातील ‘स्वयंअध्ययन’ पद्धतीच्या जोरावर तिने दहावीत ९६.४० टक्के गुण मिळवले. यासोबतच गुरुकुलाने दिलेल्या प्रतिनिधित्वाच्या संधींमुळे तिची सर्वांगीण प्रगती घडली.
दहावीनंतर स्थिर न बसता काही वेगळे करण्याच्या इच्छेने कनकने मुंबईतील नामांकित रामनिवास रुईया महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स शाखेत प्रवेश घेतला. कॉलेज जीवनात तिने NSS (राष्ट्रीय सेवा योजना) मध्ये सहभाग नोंदवला. हा तिच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला. NSS मुळे तिला शिस्त, वेळेचे नियोजन, समाजसेवा, निस्वार्थ वृत्ती आणि संघभावनेचे प्रत्यक्ष धडे मिळाले.
NSS च्या माध्यमातूनच कनकला हरियाणा येथील पानिपत येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिर (NIC Camp) मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. विविध राज्यांतील विद्यार्थ्यांसोबत राहून त्यांच्या संस्कृती, विचारसरणी आणि जीवनशैली जाणून घेण्याचा हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला. या शिबिरात महाराष्ट्रीयन संस्कृतीचे नृत्य, गीत आणि परंपरांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधण्यात आले.
यापूर्वी गुरुकुलाच्या ‘मातृभूमी परिचय शिबिरा’तर्गत गोवा व मध्य प्रदेश भेटीदरम्यान मिळालेले अनुभवही तिच्या जडणघडणीत मोलाचे ठरले. अशा शिबिरांमुळे कनकमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, संघभावना आणि आत्मविश्वास अधिक दृढ झाला.
गुरुकुलात प्रवेश, NSS मध्ये नोंदणी आणि NIC कॅम्प — हे कनक मापुस्करच्या आयुष्यातील तीन निर्णायक टप्पे ठरले आहेत. या सर्व यशाचे श्रेय तिने आपल्या आई-वडिलांना आणि ईश्वराला दिले असून, मिळालेल्या अमूल्य संधींबद्दल तिने रुईया महाविद्यालय व NSS युनिटचे मनापासून आभार मानले आहेत.
कनक मापुस्करची ही वाटचाल अनेक विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
