गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते यांची सेवानिवृत्ती

चिपळूण (संदेश सावंत)  : तालुक्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी मा. श्रीम. सशाली सिद्धार्थ मोहिते या २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. जवळपास चार दशकांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या शासकीय सेवेतून निवृत्त होत असून त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

मा. मोहिते (पूर्वाश्रमीच्या ललिता धोंडीराम जाधव) यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९६८ रोजी कोकरे बौद्धवाडी, ता. चिपळूण येथे श्रमजीवी कुटुंबात झाला. वडील श्री. धोंडीराम जाधव आणि आई श्रीमती सुनंदा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत संसार सांभाळत मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. अल्प उत्पन्न, साधे राहणीमान आणि सामाजिक मर्यादा असूनही त्यांनी मुलगा-मुलगी भेदभाव न करता तिन्ही अपत्यांना शिक्षणाची संधी दिली.

घरातील संस्कार, शिस्त आणि शिक्षणाविषयीची निष्ठा यामुळेच पुढे संपूर्ण कुटुंबाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या भावंडांनी तसेच मुलांनी उच्च शिक्षण घेऊन परदेशातही आपला ठसा उमटविला आहे.

जून १९८७ मध्ये, वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्यांनी शिक्षकी सेवेला सुरुवात केली. पुढे जिल्हा परिषद निवड मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होऊन डिसेंबर १९८७ मध्ये त्या चिपळूण तालुक्यातील निरबाडे निर्मळवाडी या दुर्गम शाळेत उपशिक्षक म्हणून रुजू झाल्या. सेवेत असतानाच त्यांनी B.A., M.A., B.Ed., M.Ed. अशी उच्च शिक्षणे पूर्ण केली.

ऑक्टोबर २००८ मध्ये सरळ सेवा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. गुहागर व चिपळूण तालुक्यांत त्यांनी विस्तार अधिकारी तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.

मार्च २०१५ मधील बोर्ड परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका कमी पडण्याचा गंभीर प्रसंग उद्भवला असताना त्यांनी तत्परतेने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधत परीक्षा सुरळीत पार पाडली. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले होते.

गुहागर तालुक्यातील चिखली बीटमध्ये त्यांनी वाचनालय चळवळ उभी केली. ६ डिसेंबर २०१० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची स्थापना केली तसेच मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून सामाजिक जाणीवेचा संदेश दिला.

विद्यार्थ्यांना दूरवर पायी जावे लागू नये म्हणून नवीन शाळांच्या मंजुरीसाठी प्रयत्न करून तीन वर्षांत पाच शाळा सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. सावर्डे बीटमध्ये “नवी दृष्टी, नवा विचार – ध्यास गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा” हे ब्रीद स्वीकारून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.

त्यांच्या सेवाप्रवासात पती मा. सिद्धार्थ मोहिते (सेवानिवृत्त आगार प्रमुख, चिपळूण आगार) यांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या जन्मगावी कोकरे येथे सेवानिवृत्ती निमित्त सदिच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध स्तरांवरील मान्यवर, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

संघर्ष, जिद्द आणि शिक्षणनिष्ठा यांचा संगम असलेला सशाली मोहिते यांचा सेवाप्रवास शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य व समाधान लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

संबंधित लेख