खडपोली मार्गावर आता ३० टनापर्यंत वाहतूक : प्रांताचा निर्णय
- by Yogesh Bandagale
- September 21, 2025
- 196 views
चिपळूण (प्रतिनिधी) : पिंपळी येथील जुना पूल खचल्यानंतर गाणे-खडपोली एमआयडीसीतील अवजड वाहतूक पूर्णपणे थांबली होती. पर्यायी शिरगांव-पेढांबे, खडपोली मार्गावर याआधी २० टनापर्यंतची वाहने सोडण्यात येत होती, मात्र शुक्रवारी सर्व संबंधित अधिकारी, खडपोली सरपंच, ग्रामस्थ आणि कारखानदार यांनी संयुक्तपणे रस्त्यातील अडथळ्यांची पाहणी केली.
या पाहणीनंतर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी या मार्गावर ३० टनापर्यंतच्या वाहतुकीस परवानगी दिली आहे. सध्या या मार्गावर रात्री १२ वाजता ते पहाटे ५ वाजेपर्यंत २० टन वजनाची वाहने शिरगांव-पेढांबेमार्गे औद्योगिक वसाहतीत येत असून, जाताना वालोटी मार्गे सोडली जात आहेत.
अवजड वाहतूक सुरू होताना काही शेतकऱ्यांनी विरोध नोंदवला होता. मात्र आमदार शेखर निकम तसेच प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी सर्वांची समजूत करून सांगितली, तसेच शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, शुक्रवारी प्रांताधकाऱ्यांच्या पाहणीला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शिवसेनेचे सचिन कदम, दशरथ दाभोळकर, तसेच इतर पक्षप्रमुख आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या निर्णयामुळे खडपोली मार्गावरील वाहतुकीस आता अधिक सोयीस्कर वातावरण मिळेल असे स्थानिकांनी सां
गितले.
