कोणतीही करवाढ नाही; ८ कोटी शिलकीचा चिपळूण नगर परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर
- by Yogesh Bandagale
- February 25, 2026
- 118 views
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत कोणतीही करवाढ न करता सन २०२६–२७चा सुधारित अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार न टाकता विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याने सभेत समाधान व्यक्त करण्यात आले. सदस्य शशिकांत मोदी यांनी ठराव मांडला, तर अंकुश आवले यांनी अनुमोदन दिले.
या अर्थसंकल्पात नगर पालिकेचे महसूल उत्पन्न ४८.४६ कोटी रुपये अपेक्षित असून भांडवली अनुदान व विविध शासकीय निधी मिळून ११५.६२ कोटी रुपये इतके उत्पन्न गृहित धरण्यात आले आहे. त्यामुळे एकूण अंदाजे उत्पन्न १६४.८ कोटी रुपये इतके अंदाजे असेल.
खर्चाच्या बाबतीत महसुली खर्च ४०.३० कोटी रुपये, तर भांडवली खर्च ११६ कोटी रुपये इतका प्रस्तावित करण्यात आला आहे. यानुसार एकूण खर्च १५६.३० कोटी रुपये असून सुमारे ८ कोटी रुपयांचा शिल्लकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. शिल्लकीचा अर्थसंकल्प असल्यामुळे आगामी काळात विकास कामांना गती मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. चर्चेदरम्यान काही ठरावांमध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या, तसेच नगर पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याबाबत सूचना करण्यात आल्या. करआधार वाढवणे, थकीत कर वसुली प्रभावी करणे, तसेच शासकीय योजनांचा अधिक लाभ मिळवण्यावर भर देण्याची मागणी नगरसेवकांनी केली.
मंजूर झालेला हा अर्थसंकल्प पुढील मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. या वेळी मुख्याधिकारी संजय जाधव, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्यासह नगर पालिकेचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
