कोकण मीडिया दिवाळी अंकाला ना. सी. फडके पुरस्कार
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 15 views
रत्नागिरी : मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ना. सी. फडके स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ (मुंबई) आणि दादर सार्वजनिक वाचनालय, काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान (गोरेगाव मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या या दिवाळी अंक स्पर्धेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी स्पर्धेचा निकाल घोषित केला असून प्रमोद कोनकर यांनी संपादित केलेल्या कोकण मीडिया अंकाची ना. सी. फडके स्मृती उत्कृष्ट अंक म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रमोद कोनकर यांनी संपादित केलेला कोकण मीडियाचा हा दहावा दिवाळी अंक आहे.
ग्रंथालय चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि दादर सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे यांच्या स्मरणार्थ वाचन चळवळीतील सेवाभावी कार्यकर्ता “ग्रंथसखा पुरस्कार” मनमाड येथील प्राथमिक शिक्षक अनिल शिनकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. स्वखर्चाने आणि मेहनतीने त्यांनी गेल्या शतकभरातील १३५० प्रकाशनांच्या हजारो दिवाळी अंकांचा संग्रहाचा ठेवा जतन केला आहे. त्यानिमित्ताने त्यांचा गौरव होणार आहे. “वैभवशाली मराठी भाषेचे दगाबाज कोण?” या विषयावरील राज्यस्तरीय लेख स्पर्धेचे पारितोषिक वितरणही यावेळी समारंभही होणार आहे.
पारितोषिक वितरण समारंभ येत्या शुक्रवारी, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दादर येथील छबिलदास रोडवरील धुरू हॉल येथे होणार आहे.
