कोकणात जाणारी मांडवी एक्सप्रेस तीन तास उशिराने
- by Yogesh Bandagale
- February 12, 2026
- 114 views
मुंबई : कोकणात जाणारी मांडवी एक्सप्रेस तब्बल तीन तास उशिराने धावल्याने सीएसएमटी आणि दादर स्थानकांवर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नियोजित वेळेनुसार सकाळी ७:२५ वाजता दादर स्थानकात पोहोचणारी गाडी दहा वाजल्यानंतर दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.
मांडवी एक्सप्रेस उशिराने धावत असल्याने अनेक प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि दादर स्थानकांवर ताटकळत उभे होते. विशेषत: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.
याबाबत मध्य रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, मांडवी एक्सप्रेस कोकणातून येताना उशिरा पोहोचल्याने सीएसएमटीवरून सुटण्यास विलंब झाला. परिणामी संपूर्ण वेळापत्रक कोलमडले.
मात्र गाडी उशिराने येत असल्याबाबत स्थानकांवर कोणतीही स्पष्ट उद्घोषणा किंवा अद्ययावत माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी संभ्रमात पडले होते. वेळेवर माहिती न मिळाल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वेळेवर माहिती देण्याची आणि उद्घोषणा प्रणाली अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
