कोकणकन्येच्या हाती मेट्रोचे स्टेरिंग; दिवीता यादवची ऐतिहासिक कामगिरी
- by Yogesh Bandagale
- April 09, 2026
- 51 views
वैभववाडी : वेगाने बदलणाऱ्या मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आज एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नपणे गावची कन्या दिवीता सुनील यादव हिने मुंबई मेट्रो मार्गिका ९ वरील पहिल्या ट्रेनची चालक म्हणून जबाबदारी पार पाडत इतिहास रचला.
मेट्रो मार्गिका ९ च्या उद्घाटनप्रसंगी दिवीताने पहिली फेरी आत्मविश्वासाने आणि अचूकतेने पूर्ण केली. तिच्या कुशल नेतृत्वामुळे प्रवाशांना सुरक्षित, सुखद आणि वेळेवर प्रवासाचा अनुभव मिळाला. मेट्रो चालक म्हणून ही तिची पहिली मोठी जबाबदारी असली तरी तिने ती अत्यंत सक्षमपणे पार पाडत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
दिवीता यादव साध्या कुटुंबातून पुढे आलेली असून तिच्या यशामागे कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी आहे. कोकणातील ग्रामीण भागातून येऊन मुंबई सारख्या महानगरात मेट्रोचे स्टेरिंग हातात घेणे ही मोठी कामगिरी मानली जात आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशासाठीही हा दिवस महत्त्वाचा ठरला. मेट्रो मार्गिका ९ सुरू झाल्यामुळे शहरातील मेट्रो जाळ्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नव्या मार्गिकेमुळे उपनगरांतील प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक होणार असून, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
या मार्गिकेमुळे मुंबईतील कार्यान्वित मेट्रोची एकूण लांबी १०० किलोमीटरच्या पुढे गेली आहे. त्यामुळे मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत मुंबईने देशात दुसरे स्थान मिळवले असून, पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे.
महिलांच्या सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणून दिवीता यादव यांच्या या कामगिरीकडे पाहिले जात आहे. पारंपरिक चौकटी मोडत त्यांनी तांत्रिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींना नवी प्रेरणा आणि दिशा मिळणार आहे.
