कोंडमळा येथे डम्परची डम्परला भीषण धडक; वायरमन अमित हुमणे यांचा जागीच मृत्यू
- by Yogesh Bandagale
- December 08, 2025
- 468 views
चिपळूण : मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर कोंडमळा येथे रविवारी (दि. ७) रात्री सुमारे ८ वाजता झालेल्या भीषण अपघातात महावितरणचे वायरमन अमित एकनाथ हुमणे (वय ३०, रा. आगवे) यांचा मृत्यू झाला. रस्त्यातच धोकादायकरीत्या उभ्या असलेल्या डम्परला मागून येणाऱ्या दुसऱ्या डम्परने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
धोकादायकरीत्या उभ्या डम्परमुळे अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकत अली हा चालक त्याच्या ताब्यातील डम्पर महामार्गाच्या डाव्या लेनवर वळणाजवळ अत्यंत धोकादायक स्थितीत उभा करून ठेवला होता. त्याचवेळी आगवेहून चिपळूणकडे येत असलेला सुरेश हुमणे यांचा डम्पर त्या स्थिर उभ्या डम्परवर जाऊन आदळला.
या धडकेत क्लिनर सीटवर बसलेले अमित हुमणे गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. चालक सुरेश हुमणे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अमित हुमणे — एक उत्तम खेळाडू आणि सेवाभावी कर्मचारी
अमित हुमणे हे महावितरणमध्ये वायरमन पदावर कार्यरत होते. त्यांनी महावितरणच्या कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय पातळीवर मान मिळवला होता. ते महावितरण कबड्डी संघाचे कर्णधार देखील राहिले होते. त्यांच्या अचानक निधनामुळे महावितरण कर्मचारीवर्ग, क्रीडाक्षेत्र तसेच आगवे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची पोलीस नोंद
या प्रकरणी शौकत अली या चालकाविरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
अमित हुमणे यांच्या निधनाने आगवे परिसरात शोककळा पसरली असून एक प्रतिभावान खेळाडू आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी अकाली निधन पावल्याची भावना व्यक्त होत आहे.
