कारवांचीवाडी येथे बेकाबू डंपर घराच्या आवारात घुसला; मोठे नुकसान, जीवितहानी टळली

रत्नागिरी, दि. १६ : शहरालगतच्या कारवांचीवाडी परिसरात रविवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एक डंपर बेकाबू होऊन थेट घराच्या आवारात घुसल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात रिक्षा, दुचाकी, शेड, विहीर व पाण्याच्या पंपाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिऱ्या–नागपूर महामार्गाच्या कामासाठी वापरला जाणारा हा डंपर संबंधित ठेकेदाराचा असल्याची माहिती मिळाली आहे. चालक कारवांचीवाडी बसस्टॉपजवळ चहा पिण्यासाठी गेला असताना डंपर न्यूट्रल अवस्थेत ठेवण्यात आल्याने तो उताराच्या दिशेने सरकू लागला. काही क्षणांत वेग घेतलेल्या डंपरने रस्त्यालगत उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली आणि पुढे जाऊन गितेश तांडेल यांच्या घराच्या आवारात घुसला.

या धडकेत रिक्षा व एक दुचाकी मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली. घरासमोरील शेडचे पत्रे व लोखंडी संरचना वाकल्या असून आवारातील विहिरीच्या कडेला तडा गेला आहे. तसेच पाण्याचा मोटार पंप पूर्णपणे निकामी झाला आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित ठेकेदार व वाहनचालकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

 

संबंधित लेख