कापसाळ फणसवाडीत लोकवस्तीत मगर; वनविभागाकडून जेरबंद
- by Yogesh Bandagale
- February 16, 2026
- 104 views
चिपळूण, दि. १६ : शहरालगतच्या कापसाळ फणसवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री लोकवस्तीत मगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रहिवासी नागेश कांबळी यांच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी तात्काळ वनविभागाला कळवले.
माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे (रामपूर), वाहनचालक नंदकुमार कदम तसेच प्रणीत कलकुटकी आणि अजय बडदे यांनी परिसराची पाहणी केली. तपासणीदरम्यान संबंधित मगर अंदाजे ८ ते ८.५ फूट लांबीची पूर्ण वाढ झालेली असल्याचे आढळून आले.
वनविभागाच्या पथकाने दक्षता घेत मगरीला सुरक्षितरीत्या जेरबंद केले. त्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
हे बचावकार्य विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई पाटील, सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. नागरिकांनी वनविभागाच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.
