एसटी महामंडळात तब्बल सतरा हजार चालक व सहाय्यक पदांची भरती
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 73 views
मुंबई : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळात तब्बल सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहाय्यक पदांची भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना स्वतः महामंडळच प्रशिक्षण देणार असून, कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा तीस हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाणार आहे.
ही माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते म्हणाले, “भविष्यात राज्यात आठ हजार नवीन बसेस दाखल होणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे चालक व सहाय्यक पदांसाठी सतरा हजार चारशे पन्नास जागांवर भरती केली जाणार आहे. दोन ऑक्टोबरपासून यासंदर्भातील ई-निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे.”
एसटी देणार उमेदवारांना प्रशिक्षण
एसटी महामंडळाच्या त्रिशतकाव्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भरती होणाऱ्या चालक व सहाय्यकांना महामंडळाकडून आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही भरती प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागनिहाय राबवण्यात येणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) हे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल.
प्रताप सरनाईक म्हणाले की, “बससेवेची वाढती संख्या व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार सेवा पुरवणे शक्य होईल. होतकरू तरुण-तरुणींनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा.”
