‘आय पॉपस्टार’मधून झळकलेली राधिका भिडे ; तरुणाईची नवी गायिका

रत्नागिरी : मराठी संगीतविश्वात नुकतंच एक नवं नाव झळकलं आहे आणि ते म्हणजे राधिका भिडे. ‘आय पॉपस्टार’ या संगीत रिअॅलिटी शोमधून प्रकाशझोतात आलेल्या राधिकाच्या “मन धावतंया तुझ्याच मागं…” या पॉप गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तरुणाईच्या मनात भिडणाऱ्या सुरावटीमुळे हे गाणं सर्वत्र व्हायरल झाले आहे.

२४ वर्षीय राधिका ही मूळ रत्नागिरीची असून सध्या मुंबईत संगीतक्षेत्रात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रसिद्ध गायिका शमिका भिडे हिची धाकटी बहीण असलेल्या राधिकाने ‘आय पॉपस्टार’च्या मंचावर सादर केलेल्या मराठमोळ्या लूकमधील परफॉर्मन्सने परीक्षक आणि प्रेक्षकांना थक्क केले. काळा ब्लाऊज, जांभळी नऊवारी, कपाळावरील चंद्रकोर आणि नथ अशा पारंपरिक लूकमध्ये तिने आधुनिक पॉप गाण्याला वेगळा रंग दिला.

राधिकाचा आवाज मृदू, पण आत्मविश्वासपूर्ण आहे. तिच्या गायकीत पारंपरिक मराठीपणा आणि आधुनिक संगीताची नवी ऊर्जा जाणवते. त्यामुळेच तिच्या गाण्याला महाराष्ट्राबरोबरच बाहेरच्या राज्यांमध्येही मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.

यापूर्वी राधिकाने अजय-अतुल आणि श्रेया घोषाल यांच्या अनेक कॉन्सर्टमध्येही सहभाग घेतला आहे. त्यातूनच तिच्या स्टेज परफॉर्मन्समध्ये प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि दमदार सादरीकरणाची झलक दिसते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तिच्या लोकप्रियतेचा अंदाज एवढ्यानेच लावता येतो की, काही दिवसांतच राधिकाचे इंस्टाग्राम फॉलोअर्स ७० हजारांच्या पुढे गेले आहेत. तरुणाईत तिचा आवाज आणि शैली जलद गतीने लोकप्रिय होत आहे.

मराठी संगीतविश्वात राधिका भिडे नव्या पॉप आवाजाची आशा म्हणून पुढे येत असल्याची चर्चा सुरु आहे.

संबंधित लेख