वाईड्सचा ‘विक्रम’ करणाऱ्या पथिरानावर १८ कोटींची बोली!
- by Yogesh Bandagale
- December 16, 2025
- 96 views
नवी दिल्ली : मागील आयपीएल हंगामात ज्या गोलंदाजीला फलंदाजांनी अक्षरशः धू-धू धुतले, सर्वाधिक वाईड चेंडू टाकण्याचा लज्जास्पद विक्रम ज्या गोलंदाजाच्या नावावर होता, त्याच खेळाडूवर आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस पडला आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना याला कोलकाता नाइट रायडर्सने तब्बल 18 कोटी रुपयांत आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
IPL 2025 : पथिरानासाठी विसरण्यासारखा हंगाम
आयपीएल 2025 हा मथीशा पथिरानासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखाच ठरला. या हंगामात तो सर्वाधिक वाईड चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला. त्याने तब्बल 32 वाईड बॉल्स टाकल्या. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना 12 सामन्यांत त्याने 13 विकेट्स घेतल्या, मात्र 10.13 चा इकॉनॉमी रेट ही मोठी डोकेदुखी ठरली. या कामगिरीनंतर सीएसकेने त्याला रिलीज केले आणि विशेष म्हणजे ऑक्शनमध्ये चेन्नईने त्याच्यावर एकही बोली लावली नाही.
मथीशा पथिरानाचा IPL प्रवास
पथिरानाने 2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने सलग चार हंगाम चेन्नई सुपर किंग्सकडून खेळले. आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने 32 सामने खेळत 47 विकेट्स घेतल्या असून त्याचा एकूण इकॉनॉमी रेट 8.6 आहे. आकडेवारी पाहता, एका खराब हंगामामुळे त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावणे योग्य ठरणार नाही, हेच केकेआरने दाखवून दिले आहे.
KKRचा मोठा मास्टरस्ट्रोक
मथीशा पथिरानाला संघात घेऊन कोलकाता नाइट रायडर्सने आपला बॉलिंग अटॅक अधिक धारदार केला आहे. डेथ ओव्हर्समधील त्याची स्लिंग अॅक्शन आणि यॉर्कर टाकण्याची क्षमता त्याला खास बनवते. आंद्रे रसेलच्या निवृत्तीनंतर डेथ ओव्हर्समध्ये निर्माण झालेली पोकळी पथिराना भरून काढू शकतो, असा विश्वास केकेआर व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
धोनी – पथिरानाचा खरा गुरु
मथीशा पथिरानाच्या कारकिर्दीत एम.एस. धोनी यांचा मोठा वाटा आहे. धोनीनेच सर्वप्रथम या अनोख्या अॅक्शनच्या गोलंदाजावर विश्वास दाखवला आणि त्याला डेथ ओव्हर्समध्ये संधी दिली. IPL 2023 मध्ये पथिरानाने 19 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली, आणि त्याच कामगिरीच्या जोरावर त्याला श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळाली.
KKRचा बॉलिंग अटॅक अधिक भयानक
पथिरानाच्या आगमनामुळे केकेआरचा गोलंदाजी विभाग आणखी मजबूत झाला आहे. संघात आधीच सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक, वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांसारखे दर्जेदार गोलंदाज आहेत. त्यात पथिरानाची भर पडल्याने केकेआरचा बॉलिंग अटॅक 2026 मध्ये प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार, यात शंका नाही.
