मराठी व्यक्ती पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
- by Yogesh Bandagale
- December 14, 2025
- 95 views
पिंपरी-चिंचवड : येत्या 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठा उलथापालथीचा क्षण येईल आणि भारताचा पंतप्रधान बदलेल, असा खळबळजनक दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानपदावर मराठी व्यक्ती विराजमान होईल आणि ती व्यक्ती भाजपचीच असू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘जनगणमन’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला. जगभरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी अमेरिकेतील एका मोठ्या स्टिंग ऑपरेशनचा उल्लेख केला. अमेरिकेत इस्रायलशी संबंधित गुप्तहेराने अनेक नामवंत व्यक्तींच्या बंगल्यांमध्ये कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात अनेक दिग्गजांची नावे समोर येण्याची शक्यता असून, त्यासाठी अमेरिका सरकार येत्या 19 डिसेंबरला विशेष कायद्याअंतर्गत काही नावे जाहीर करणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.
या घडामोडींचे पडसाद भारताच्या राजकारणावर उमटू शकतात आणि त्यातून देशात मोठा राजकीय बदल घडू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मात्र, जर बदल झाला तरी काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही, कारण सध्या काँग्रेसकडे बहुमत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आठवड्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही पृथ्वीराज चव्हाण यांनी असाच दावा केला होता. अमेरिकेत सुरू असलेल्या ‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या कागदपत्रांचे संपूर्ण तपशील जाहीर झाल्यास त्याचा परिणाम भारताच्या राजकीय समीकरणांवरही होऊ शकतो. जेफ्री एपस्टाईन प्रकरणात अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांची नावे समोर येत असून, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही त्यात उल्लेख असल्याचे दिसते. अमेरिकन संसदेच्या ताब्यात सुमारे दहा हजार कागदपत्रे असून ती सार्वजनिक झाल्यास मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
