मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं
- by Yogesh Bandagale
- December 22, 2025
- 49 views
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेसेना आणि मनसेचे कार्यकर्ते ज्याची आतूरतेनं वाट बघतायत तो क्षण जवळ आला आहे. संजय राऊत म्हणतात ते खरं असेल, तर उद्याच ठाकरेंच्या महायुतीची घोषणा होईल. त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठकांचं जोरदार सत्र सुरू होतं. संजय राऊतांपासून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई ही मंडळी मातोश्री आणि शिवतीर्थादरम्यान धावपळ करत होते. यातून दोन्ही पक्षांच्या हाती नेमकं काय लागलंय ते पाहुयात,
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा शब्द पडू द्यायचा नसेल, तर ठाकरे बंधूंना मंगळवारचा सूर्य उगवताच युतीची घोषणा करायला हवी. कारण 23 डिसेंबरपासून, महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात होणार आहे. आता मंगळवारच्या सूर्याला कोणकोणत्या राजकीय घडामोडी पाहायला मिळताहेत हे लवकरच कळेल.
ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत आणि मनसेच्या बाळा नांदगावकरांसाठी सोमवार बऱ्यापैकी दगदगीचा होता. आधी संजय राऊत राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. मग बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. तीन एक तासाच्या चर्चेनंतर मनसे नेत्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या घराचा रस्ता धरला. आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांना एवढ्या चकरा माराव्या लागण्याचं कारण म्हणजे काही जागांवरचा तिढा.
शिवडी, दादर, माहीम, भांडुप, विक्रोळी मतदारसंघातील काही जागांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. कारण हे सगळे भाग मराठीबहुल आहेत. या जागांवरून जास्त ताणू नका अशा सूचना राज ठाकरेंनी संजय राऊतांसह स्वतःच्या पक्षातील नेत्यांनाही दिला होता. सोमवारचा सूर्य मावळेस्तोवर शिवडी, दादर आणि माहीममधल्या बहुतांश प्रभागांचा तिढा सोडवण्यात दोन्ही पक्षांना यश आलं होतं. मात्र, भांडुप आणि विक्रोळीवरून रात्री उशीरापर्यंत खलबतं सुरू राहणार असल्याचं कळतंय.
