नीलेश राणेंची स्पष्टोक्ती : “भाजप माझंही कुटुंब, रवींद्र चव्हाणांविषयी आदर कायम
- by Yogesh Bandagale
- December 05, 2025
- 54 views
मुंबई : भाजप आणि शिवसेनेत अलीकडे उद्भवलेल्या तणावानंतर शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी शेवटी मौन सोडत परिस्थिती स्पष्ट केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण किंवा इतर कोणत्याही नेत्याविषयी आपल्याला कोणताही राग नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट त्यांच्या मनात रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आदर असून तो कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राणे म्हणाले,
“माझ्यात आणि रवींद्र चव्हाण यांच्यात कसला वाद होता? मी स्वबळावर निवडणूक लढवली. माझी पहिल्यापासून इच्छा होती की युती व्हावी, पण ती झाली नाही. मी केवळ माझी भूमिका जनतेसमोर मांडली.”
ते पुढे म्हणाले की भाजपसुद्धा आपलेच कुटुंब आहे. “मी भाजपपासून फारकत घेऊ शकत नाही. हा कुटुंबाचा विषय आहे. आम्ही आपल्यात सोडवून घेऊ.”
यावेळी त्यांनी तक्रारीबाबत ठाम भूमिका घेतली.
“मी केलेली तक्रार मागे घेणार नाही. कारण ज्यांच्यासाठी तक्रार केली त्यांच्यावर अन्याय होईल. मी केवळ आरोप केले नाहीत, तर पुरावेही दिले आहेत. भाजपमधून कोणत्याही नेत्याने तक्रार मागे घ्या असे सांगितलेले नाही.”
आता ते भाजप नेत्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.
“मी रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. हा विषय पर्सनल कधीच नव्हता. प्रत्येकाने आपापल्या पक्षाची भूमिका मांडली होती.”
ते म्हणाले, “आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आहोत. कुटुंब एक राहावे यासाठी मी आधीपासून प्रयत्न करत होतो.”
निवडणूक प्रक्रियेबाबत त्यांनी पुढील काळात सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली.
“नगरपालिका निवडणुकीसारखी निवडणूक यापुढे होऊ नये. आमची ताकद एकत्र आहे. ती ताकद एकत्र लढली तर अपेक्षित निकाल मिळेल. मी आणि नीतेश राणे — दोघांनीही कधीच वाद निर्माण करणारे विधान केले नाही.”
ते पुढे म्हणाले की बातम्यांमध्ये रंगवून दाखवलेले वातावरण वास्तव नव्हते. “मी रवींद्र चव्हाण किंवा इतर कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. मी फक्त एवढेच म्हटले की निवडणूक संस्कृती आपल्या जिल्ह्यात बिघडू नये.”
राणेंच्या या भूमिकेमुळे भाजप–शिवसेना नात्यातील तणाव शमण्याची चिन्हे दिसत असून पुढील राजकीय घडामोडींवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
