१३ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं

अहिल्यानगर, प्रतिनिधी : साईबाबांचे जागतिक स्तरावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी जवळील लोणी गावात 13 वर्षांच्या शाळकरी मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरला असून, राज्याच्या विधिमंडळातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मुलगी रस्त्यावर थांबलेली असताना एका अज्ञात मुलाने तिच्यावर अॅसिड फेकले. घटनेनंतर जखमी मुलीवर लोणी येथे उपचार सुरू असून ती भीतीच्या धक्क्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भाग असल्यामुळे परिसरात सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, पोलिसांनी तपासाला वेग दिला असून आरोपी गावातीलच असण्याची शक्यता आहे. “पोलीस कसून तपास करत आहेत आणि आरोपीला लवकरच अटक होईल. अशा गुन्ह्यांमध्ये कठोरात कठोर शिक्षा व्हावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री आदिती तटकरे यांनीही घटनेचा निषेध करत सांगितले की, पीडितेवर तातडीने उपचार सुरू आहेत आणि तिच्या कुटुंबीयांना “मनोधैर्य” योजनेतून आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव आहे. “आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

दरम्यान, आमदार नाना पटोले यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली. तसेच आमदार मनिषा कायंदे यांनीही संताप व्यक्त करत आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

सध्या पोलीस प्रशासनाकडून आरोपीचा शोध सुरू असून, अधिक तपास केला जात आहे. मुलीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित लेख