मुंबईत भाजप–शिंदेसेना युतीला बहुमत; चंद्रपूर व लातूरमध्ये काँग्रेसची बाजी
- by Yogesh Bandagale
- January 16, 2026
- 62 views
मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरू झाली. १५ जानेवारी रोजी झालेल्या मतदानात ८९३ वॉर्डसाठी एकूण १५,९३१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजप–शिंदेसेना युतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाची सत्ता उलथवून टाकली गेली असून, मुंबईत पुन्हा एकदा भाजपप्रणीत युतीचा झेंडा फडकला आहे.
राज्यात एकीकडे भाजपचा दबदबा दिसत असतानाच चंद्रपूर आणि लातूर महानगरपालिकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIM पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून, अमरावतीत रवी राणा यांच्या पक्षाने दुसरे स्थान पटकावले आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी निकालांवर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “आज जे निकाल आले आहेत, त्याच आकड्यांची माहिती भाजपच्या एका नेत्याने दोन दिवसांपूर्वीच दिली होती. हे आकडे त्यांना आधीच कसे माहीत होते? यामागे नेमके काय रहस्य आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. या निवडणुकीत काहीतरी गडबड नक्कीच झाली आहे.”
नवी मुंबई महानगरपालिकेचा निकालही जवळपास स्पष्ट झाला असून, येथे भारतीय जनता पार्टीने एकहाती सत्ता मिळवली आहे. गणेश नाईक यांनी केलेल्या विधानानुसार, भाजपने एकनाथ शिंदे यांचा ‘टांगा पलटी’ केल्याचे चित्र दिसून आले. या विजयानंतर भाजपकडून नवी मुंबईत ‘टांगा पलटी’चे बॅनर लावून शिवसेना शिंदे गटाला टोला लगावण्यात आला आहे.
एकूणच, या महानगरपालिका निवडणुकांमधून राज्याच्या राजकारणात मोठे बदल आणि नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली आहे.
