मुंबईत सत्तापालट होणार!

मुंबई : जनमतसह विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबई महापालिकेत सत्तापालट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. जनमतच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीला १३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना मिळून ६२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेस-वंचित आघाडीला २०, तर इतर पक्षांना ७ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष लागले होते. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने वातावरण तापले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत मराठी मतदारांना भावनिक साद घातली होती. ठाकरे बंधूंच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला असला, तरी एक्झिट पोलमधील आकडे वेगळे चित्र दर्शवत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, रुद्र रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांना १२१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीला ७१ जागा, काँग्रेस-वंचित आघाडीला २५, तर इतरांना १० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटाचे वर्चस्व

सामच्या एक्झिट पोलनुसार वसई-विरार महापालिकेत भाजपला २७, शिवसेना (शिंदे गट) ५, काँग्रेस ३, शिवसेना (ठाकरे गट) ७, तर वंचित बहुजन आघाडीला ७२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना (शिंदे गट) ५७ जागांवर विजय मिळवेल, तर भाजप ४२ जागांवर आघाडीवर राहील, असा अंदाज आहे. मनसेला ६, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी २, वंचित बहुजन आघाडीला २, तर इतरांना ६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उल्हासनगरमधील चित्र

उल्हासनगर महापालिकेत भाजपला २८, शिवसेना (शिंदे गट) २९, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक व इतर पक्षांना १२, काँग्रेसला २, शिवसेना (ठाकरे गट) १, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १५, तर मनसेला २ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी आघाडी मजबूत

‘प्राब’ने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला २४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५१, शिवसेना (शिंदे गट) ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाला २, मनसेला १, तर शिवसेना (ठाकरे गट) व वंचित बहुजन आघाडीला शून्य जागा मिळतील, असा अंदाज आहे.

पुणे महापालिकेत भाजप आघाडीवर

‘प्राब’च्या अंदाजानुसार पुणे महापालिकेत भाजपला ९३ जागा मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४३, शिवसेना (शिंदे गट) ६, शिवसेना (ठाकरे गट) ७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८, काँग्रेस ८, तर मनसेला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोल्हापूरचा एक्झिट पोल

जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापुरात भाजपला २९ ते ३२, शिवसेना (शिंदे गट) १८ ते २१, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ९ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १९ ते २३, शिवसेना (ठाकरे गट) ३ ते ४, शरद पवार गटाला ० ते १, मनसेला ० ते १, तर इतरांना २ ते ४ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित लेख