माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
- by Yogesh Bandagale
- December 17, 2025
- 45 views
मुंबई : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा समोर आला आहे. याच प्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करत पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असून, आता पक्षप्रमुख अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोकाटे यांना त्वरित अटक करायला हवी - ॲड. सरोदे
नाशिक पोलिसांनी या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना त्वरित अटक करायला हवी. सत्ता स्थानी असलेल्या व्यक्तीकडून चूक होते, त्यावेळी नाशिक पोलिस कसे वागतात? यावरून त्यांचे मूल्यांकन करणार असल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी सतसतविवेक बुद्धीच्या आधारे पोलिसांना हा निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे आतापर्यंत चांगले चालत फिरत असलेले माणिकराव कोकाटे अचानक रुग्णालयात दाखल का झाले? या संदर्भात पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोकाटे यांना अटक करण्यासाठी पोलिसांना कोणत्याही आदेशाची आवश्यकता नसल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे.
