मला महाराष्ट्रात ‘ट्रिपल इंजिन’ सरकार पाहिजे – अमित शहा

मुंबई : राज्यात सध्या डबल इंजिन सरकार आहे, मात्र मला महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपने पूर्ण ताकदीने लढून विरोधकांचा असा सफाया करा की ते दुर्बिणीनेही दिसू नयेत, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भाजप कार्यकर्त्यांना केले.

अमित शहा यांच्या हस्ते आज मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पक्ष कार्यालयाचे महत्त्व अधोरेखित केले. “भाजप कार्यकर्त्यांसाठी पक्ष कार्यालय हे केवळ कार्यालय नसून मंदिरासारखे आहे. येथेच आमचे संस्कार, प्रशिक्षण आणि विचारांचे संवर्धन होते,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आपल्या कार्यकर्त्यांमुळे, पक्षाच्या तत्त्वनिष्ठ कामामुळे आज महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही सत्ता मिळाली, तर महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार निर्माण होईल. तेव्हा कार्यकर्त्यांनी बूथस्तरापासून पूर्ण परिश्रम घालवावे.”

‘भाजपमध्ये बूथ कार्यकर्ताही पक्षाध्यक्ष होऊ शकतो’

यावेळी अमित शहा यांनी भाजपमधील अंतर्गत लोकशाही आणि प्रगतीच्या संधींचाही उल्लेख केला. “1981 मध्ये मी बूथ अध्यक्ष म्हणून पक्षात आलो. तेथून पक्षाध्यक्ष आणि आता केंद्रीय मंत्री होण्याची संधी मला मिळाली. भाजप हा घराणेशाहीवर नव्हे तर कार्यक्षमता आणि लोकशाही मूल्यांवर चालणारा पक्ष आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, “या देशात एक गरीब चहावाल्याचा मुलगा तीनवेळा पंतप्रधान झाला. ही भारतीय लोकशाहीची आणि भाजपच्या संघटनशक्तीची ताकद आहे. ज्यांच्याकडे अंतर्गत लोकशाहीच नाही, ते देशाच्या लोकशाहीचे रक्षण कसे करणार?”

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री, भाजप पदाधिकारी, खासदार, आमदार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख