मनावर दुःखाचा डोंगर, नव्या आशेने पुढे चालत राहीन!
- by Yogesh Bandagale
- January 31, 2026
- 129 views
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राजभवनात त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून, त्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
“आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन.”
महाराष्ट्रातील जनतेने या कठीण काळात दिलेल्या प्रेम आणि विश्वासाची साथ हेच आपले बळ असल्याचे नमूद करत, “दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेने पुढे चालत राहीन,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
