धनंजय मुंडे 'आत' माणिकराव कोकाटे 'बाहेर'?
- by Yogesh Bandagale
- December 17, 2025
- 37 views
मुंबई : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद जाणारे हे जवळपास निश्चित झाले आहे. या घटनाक्रमामुळे राज्याचे राजकारण तापले असताना आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव पुन्हा एकाद मंत्रिपदाच्या शर्यतीत आले आहे. कोकाटेंचे मंत्रिपद गेल्यास त्यांचे पद मुंडेंकडे सोपवण्यात येईल असा दावा केला जात आहे. पण त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झाली नाही.
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर आज त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे. कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाला आणि त्यांना अटक झाली तर त्यांचे मंत्रिपद जाईल. त्यामुळे त्यांचे पद कुणाकडे द्यायचे? या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व सरकारमध्ये धीरगंभीर चर्चा सुरू झाली आहे.
कोकाटेंची जबाबदारी कुणाकडे द्यायची?
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली आहे. सूत्रांच्या मते, मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना कोकाटेंकडील जबाबदारी कुणाकडे द्यायची? असा थेट सवाल अजित पवारांना केला आहे. यामुळे अजित पवारांची गोची झाली आहे. पण कोकाटेंची जागा धनंजय मुंडे यांच्या रुपात भरून काढली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली जाईल.
धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात झालेल्या चौफेर टीकेमुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांचे कृषिखाते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले होते. पण नंतर कोकाटे आपल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांचे कृषिमंत्रीपद काढून दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवले होते. तसेच भरणे यांचे क्रीडामंत्रीपद कोकाटेंकडे सोपवले होते. आता कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आल्यामुळे त्यांच्या जागी पुन्हा धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची चर्चा सुरू झाली आहे.
धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर
दुसरीकडे, धनंजय मुंडे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता की घरवापसीसाठी उत्तम 'मुहूर्त' मानत फिल्डिंग लावली? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. धनंजय मुंडे यांनी संसदेत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. एनडीएमधील बहुंताश वरिष्ठ नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे मुंडे त्यांच्याशी मंत्रीपदासाठी चर्चा करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
