कष्टकऱ्यांचे हक्क जपणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचे निधन
- by Yogesh Bandagale
- December 08, 2025
- 77 views
पुणे : कष्टकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी आणि वंचित घटकांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे आज रात्री 8.25 वाजता निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती आणि उपचारासाठी त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्या पथकाखाली गेल्या 10–12 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आज रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीला मोठी पोकळी निर्माण झाली असून कष्टकऱ्यांचे प्रिय नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
अखेरच्या भेटी
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती. गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांच्या निधनानंतर पवारांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत श्रद्धांजली वाहिली होती, त्यानंतर आता आणखी एक समाजवादी दिग्गज हरपल्याने दु:ख व्यक्त होत आहे.
अंत्यदर्शन आज
बाबा आढाव यांचे पार्थिव उद्या सकाळी 10 वाजता मार्केटयार्ड येथील हमाल भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी 4 ते 5 वाजता अंत्यसंस्कार होतील.
कोण होते बाबा आढाव?
-
1970 च्या दशकात पुणे महापालिकेचे नगरसेवक
-
समाजवादी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते
-
रिक्षा पंचायतीचे नेते
-
‘एक गाव–एक पाणवठा’ या ऐतिहासिक सामाजिक आंदोलनाचे प्रणेते
-
आयुष्यभर शोषित, पीडित, हमाल, रिक्षाचालक, कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी प्रखर लढा
-
अखेरच्या दिवसांपर्यंत सामाजिक भान जपत कायम सक्रिय
93 व्या वर्षीही आंदोलन
राज्यातील आणि देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर ते परखड भाष्य करीत असत. सत्ता मिळवण्यासाठी होत असलेल्या राजकीय घडामोडींवर टीका करून “अखेर 140 कोटी जनता ठरवते कोणाचं काय” अशी थेट भूमिका त्यांनी व्यक्त केली होती.
राष्ट्रीय राजकारणावर देखील त्यांनी भूमिका घेत 93 व्या वर्षी आंदोलनात सहभागी होऊन लढाऊ वृत्ती जिवंत ठेवली होती.
