अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात; स्व. अजित पवारांना दोन्ही सभागृहात श्रद्धांजली
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 24 views
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज (२३ फेब्रुवारी) मुंबईतील विधानभवनात होत असून पहिल्याच दिवशी सभागृहाचे वातावरण भावूक होण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधानसभेत आणि विधान परिषदेत शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च २०२६ रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शोकप्रस्तावावर विशेष चर्चा
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत स्व. अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे. पारंपरिक पद्धतीनुसार हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जाईल. मात्र, विविध पक्षांतील सदस्यांनी अजित पवार यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त करण्याची इच्छा दर्शविल्याने शोकप्रस्तावावर विशेष चर्चा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे गटनेते तसेच प्रत्येक पक्षातील किमान तीन सदस्य सभागृहात भावना व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हेही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत उपस्थित राहणार आहेत. शोकप्रस्तावाच्या वेळी ते सभागृहात हजर राहणार असून ते भाषण करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२८ जानेवारीचा विमान अपघात
अजित पवार २८ जानेवारी रोजी बारामतीकडे जात असताना त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताना कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. २९ जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला होता. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे.
अपघाताबाबत संशय
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विमानात आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच वैमानिकाने विमान मुद्दाम आदळले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली असल्याचे समजते.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, शोकप्रस्तावानंतर नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे.
