अनिल परब यांचा रामदास कदमांवर पलटवार, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची घोषणा
- by Yogesh Bandagale
- October 04, 2025
- 77 views
मुंबई : शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता शिवसेना (ठाकरे गट)ने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन कदमांवर थेट पलटवार केला असून, अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याची घोषणा केली आहे.
परब म्हणाले, “रामदास कदम यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवर संशय घेतला, हे अत्यंत संतापजनक आहे. बाळासाहेबांच्या शेवटच्या क्षणी मी स्वतः 24 तास तिथे उपस्थित होतो. त्यांच्या आजारपणात डॉक्टरांचे पथक सतत उपस्थित होते. प्रत्येक क्षण मॉनिटर केला जात होता. त्यामुळे कदम यांनी केलेले आरोप 100 टक्के खोटे आहेत.”
ते पुढे म्हणाले, “बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस ठेवला होता, असे म्हणणाऱ्या कदमांची अक्कल गुडघ्यात आहे का? कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येतो का? हे अगदी सामान्य ज्ञानाचेही प्रकरण आहे. तरीही त्यांनी असा बेसुमार आरोप केला म्हणजे त्यांच्या बोलण्यामागे काही राजकीय हेतू आहेत, हे स्पष्ट दिसते.”
अब्रूनुकसानीचा दावा व नार्को टेस्टची मागणी
अनिल परब यांनी पुढे जाहीर केले की, “रामदास कदम यांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे मी स्वतः त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्या दाव्यातून मिळालेली संपूर्ण रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येईल. तसेच आम्हालाही नार्को टेस्ट व्हायला हरकत नाही, पण कदम यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे.”
‘भाडखाऊ आणि भाडगिरी करणाऱ्यांना उत्तर देणे आम्हाला गरजेचे वाटत नाही’
परब यांनी टीकेचा सूर चढवत म्हटलं, “भाडखाऊ आणि भाडगिरी करणाऱ्यांना उत्तर देणे आम्हाला आवश्यक वाटत नाही. पण त्यांनी आमच्या दैवताच्या — बाळासाहेबांच्या मृत्यूवर संशय घेतला म्हणून बोलणे भाग आहे. बाळासाहेब गेल्यानंतर 14-15 वर्षांनी कदम यांना कंठ फुटला आहे. 2014 मध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्री केले, मुलाला आमदारकी दिली — तेव्हा उद्धव ठाकरे वाईट नव्हते का?”
रामदास कदम यांच्या वैयक्तिक जीवनावरही हल्ला
परब म्हणाले, “1993 साली रामदास कदम यांच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले होते. त्या प्रकरणात काय घडलं याचीही चौकशी व्हायला हवी. तिला जाळले की तिने स्वतःला जाळले — हे नार्को टेस्टमध्ये स्पष्ट झाले पाहिजे. तसेच खेडमध्ये कोणाला बंगले बांधून दिले, त्या बंगल्यांबाबतचा वादही चौकशीअंतर्गत आला पाहिजे.”
या आरोप-प्रत्यारोपामुळे शिवसेनेचे दोन गट पुन्हा आमनेसामने आले असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादळ उठवण्याची चिन्हे दिसत आहेत.
