चिपळूणच्या विकासाचा ध्यास घेणारे प्रांताधिकारी आकाश लिगाडे

काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे वाशिष्टी नदीची पातळी वाढून पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रात्रभर जागता पहारा ठेवत कोळकेवाडी धरणातून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करून चिपळूणकरांना दिलासा देणारे आणि नागरिक शांत झोपू शकतील याची काळजी घेणारे अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी आकाश लिगाडे.

चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या क्षेत्रात नेहमी आघाडीवर राहून काम करणाऱ्या या अधिकारी व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीवर एक दृष्टिक्षेप.

विद्यार्थी अवस्थेतच अभ्यासू व यशस्वी प्रवास

सोलापूर जिल्ह्यातील अकोला येथील सुपुत्र आकाश लिगाडे यांनी बी.ई. (मेकॅनिकल) पदवी मुंबईतील के. जे. सोमय्या महाविद्यालयातून पूर्ण केली. २००६ साली त्यांनी एमपीएससीची परीक्षा देऊन तहसीलदार पद मिळवले. मात्र यावर समाधान न मानता पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न केला आणि २००७च्या एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला.

निबंध लेखनात शालेय जीवनापासूनच अनेक पारितोषिके मिळवणारे लिगाडे हे अफाट वाचनामुळे अभ्यासू व बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी “संपूर्ण मराठी” हे पुस्तक लिहून एमपीएससी परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी अमूल्य योगदान दिले. राज्यभर व्याख्यान देत विद्यार्थ्यांना दिशा दाखवणे, हा त्यांचा आजवरचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे.

प्रशासनातील उल्लेखनीय कार्य

तहसीलदार म्हणून ठाण्यासह अनेक ठिकाणी त्यांनी काम केले. चिपळूणमध्ये रुजू झाल्यावर त्यांनी सामाजिक उपक्रम, आपत्ती व्यवस्थापन आणि विकासकामे यावर भर दिला.

मतदान जनजागृती मोहिमेत त्यांनी गॅस सिलेंडरद्वारे संदेश देत “माझं मत – माझा अधिकार” ही संकल्पना प्रभावी केली.

२६२ विधानसभा मतदारसंघात Run for Vote Awareness मॅरेथॉन यशस्वीपणे आयोजित केली.

निवडणूक आयोगाने त्यांना कोकण विभागात उत्कृष्ट मतदार नोंदणी करणारे अधिकारी म्हणून गौरवले.

पर्यावरण आणि स्वच्छता उपक्रम

प्लास्टिकमुक्ती मोहिमेत ३ लाखांच्या खर्चाचे ४० लोखंडी पिंजरे बसवून त्यांनी स्वच्छतेस चालना दिली.

चिपळूण नगर पालिकेच्या प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला.

कळंबस्ते रेल्वे फाटक येथे सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या सहकार्याने १४९ प्रजातींची १२५२ झाडे लावून वनराई उभारली.

आपत्ती व्यवस्थापनातील दूरदृष्टी

चिपळुणात गाळमुक्त अभियानात आघाडीवर राहून त्यांनी पूरस्थिती टाळण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शहरात पाणी शिरू नये, व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान टाळले जावे यासाठी त्यांनी सक्षम नियोजन केले. अलीकडील अतिवृष्टीत त्यांचे कार्य चिपळूणकरांसाठी दिलासा देणारे ठरले.

गौरव व कार्यक्षमता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवस कृती आराखडा उपक्रमात चिपळूणचे प्रांताधिकारी कार्यालय कोकण विभागात प्रथम क्रमांकावर राहिले. यामागे लिगाडे यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले.

अभ्यासू व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व

लिगाडे यांचे वाचन दांडगे असून ते कोणत्याही विषयावर परखड व प्रभावीपणे बोलतात. निरोगी आयुष्य जगण्यासाठीचे अभ्यासपूर्ण सल्ले ते देतात. अधिकारी म्हणून महसूल विभाग, न्याय दंडाधिकारी व विकास कामे या सर्वच अंगांनी त्यांनी चिपळूणला नवी दिशा दिली आहे.

अशा या कर्तव्यदक्ष, अभ्यासू, दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
– योगेश बांडागळे

संबंधित लेख