कर्तव्य, समाजभान आणि धडाकेबाज कारवाईचे प्रतीक: डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 49 views
योगेश बांडागळे
गेल्या दोन वर्षांत चिपळूणमध्ये कार्यरत असताना राजमाने यांनी केवळ गुन्हे उकलण्यातच नव्हे तर शहराच्या सुरक्षा व्यवस्थेतही मोलाची भर घातली. चोऱ्यांच्या घटनांवर लगाम, सावर्डेतील खून प्रकरणाचा उलगडा, गुहागरमधील खुनाचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण करण्याबरोबरच शहरात ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा पुढाकारही त्यांनी घेतला. यामुळे त्यांचे नाव लोकाभिमुख व दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्यांत गणले गेले.
पूरग्रस्तांसाठी ‘राजामाणूस’
मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीच्या पुरग्रस्त भागातील रहिवासी असलेले राजमाने पुरपीडितांची वेदना स्वतःची मानतात. दरवर्षी महापुराचा फटका बसणाऱ्या भागातील नागरिकांना त्यांनी सतत मदतीचा हात दिला.
“ही मदत नसून माझे कर्तव्य आहे” – या त्यांच्या वाक्यातूनच त्यांचा स्वभाव आणि समाजाशी असलेली बांधिलकी स्पष्ट होते.
२०१९ च्या महापुरात त्यांनी मदतकार्यात स्वतः झोकून दिले. तर कोरोना काळात रावेत परिसरातील गरीब, गरजू, हातावर पोट असणारे मजूर तसेच परप्रांतीय कामगारांना अन्नधान्य, किराणा किट वाटप करूनच थांबले नाहीत, तर प्रशासनाशी समन्वय साधून त्यांना त्यांच्या गावी सुरक्षित पोहोचवले.
उल्लेखनीय कारकीर्द
जयसिंगपूर आणि सांगली येथे शिक्षण घेऊन, फिजिक्स विषयातून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. करत असताना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळाली आणि १९९२ मध्ये पीएसआय म्हणून निवड झाली. १९९४ मध्ये अंधेरी पोलीस ठाण्यात पहिली नियुक्ती मिळाल्यानंतर, विडोशी, सांगली, विश्रामबाग, शिवणी वांगी अशा पोलीस ठाण्यांत सेवा बजावली. राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असताना पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली.
अमरावती येथे वाहतूक प्रमुख म्हणून वाहतूक व्यवस्थापनात यशस्वी प्रयोग केले. नांदगाव पेठ व कोल्हापुरी वेशी ठाण्यांचे प्रमुख म्हणून जातीय तणावाचे प्रसंग कुशलतेने हाताळले. कराड, महाबळेश्वर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड येथेही त्यांनी ठसा उमटवला.
विशेष क्षण
अमरावतीत कार्यरत असताना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या अमरावती दौऱ्यात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. महाबळेश्वर येथे कार्यरत असताना अभिनेता आमिर खान यांच्याशीही त्यांची भेट झाली. हे क्षण त्यांनी स्मरणात जपले आहेत.
चिपळूणवासीयांचा निरोप
राजमाने यांच्या बदलीची बातमी कळताच शहरात हळहळ व्यक्त होत आहे. लोकांशी मनमोकळा संवाद, गरजूंना तत्काळ मदत, आणि गुन्हे उकलण्यातली गती यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून गेले.
आता त्यांच्या जागी येणाऱ्या प्रकाश बेले यांच्याकडूनही नागरिकांना तितकीच तत्पर आणि लोकाभिमुख सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-योगेश बांडागळे
