यूपीएससीचा अंतिम निकाल; अनुज अग्निहोत्री देशात प्रथम
- by Yogesh Bandagale
- March 06, 2026
- 36 views
नवी दिल्ली : Union Public Service Commission (यूपीएससी) ने सिव्हिल सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर केला असून राजस्थानमधील कोटा येथील अनुज अग्निहोत्री यांनी अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत एकूण ९५८ उमेदवार विविध केंद्रीय सेवांसाठी पात्र ठरले आहेत. संपूर्ण निकाल अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर उपलब्ध करण्यात आला आहे.
१८० उमेदवारांची आयएएससाठी निवड
जाहीर झालेल्या निकालानुसार एकूण १८० उमेदवारांची आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) साठी निवड झाली आहे. याशिवाय इतर उमेदवारांची निवड आयपीएस, आयएफएससह विविध केंद्रीय सेवांसाठी करण्यात आली आहे.
अनुज अग्निहोत्री यशाचा प्रवास
यूपीएससीमध्ये अव्वल ठरलेले अनुज अग्निहोत्री यांनी यापूर्वीही दोन वेळा ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २०२३ च्या यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांची दिल्ली येथे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) पदावर नियुक्ती झाली होती.
अनुज यांचे वडील के. बी. अग्निहोत्री राजस्थान अणुऊर्जा केंद्रात कार्यरत आहेत, तर आई मंजू अग्निहोत्री गृहिणी आहेत. अनुज यांनी रावतभाटा अणुऊर्जा केंद्रीय विद्यालयातून शिक्षण घेतले असून बारावीमध्ये त्यांनी ९४ टक्के गुण मिळवले होते. अभ्यासासोबत त्यांना टेबल टेनिस खेळण्याची विशेष आवड आहे.
एकांश धुल तिसऱ्या क्रमांकावर
हरियाणातील पंचकुला येथील रहिवासी एकांश धुल यांनी या परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवला आहे. ते दिल्ली विद्यापीठातील Shri Ram College of Commerce मधून बीए ऑनर्स पदवीधर आहेत.
एकांश यांची आई निर्मला या शाळेच्या मुख्याध्यापिका असून वडील कृष्ण धुल्ल हे भाजपचे नेते आहेत. २०२४ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्यांना ३४२ वा क्रमांक मिळाला होता, तर यावर्षी त्यांनी मोठी झेप घेत तिसरा क्रमांक पटकावला.
निकाल कसा पाहायचा
उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादी Union Public Service Commission च्या अधिकृत संकेतस्थळांवर upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर पाहता येणार आहे. येथे उमेदवारांना संपूर्ण निकाल आणि निवड यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
