१६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी; कर्नाटकचा मोठा निर्णय
- by Yogesh Bandagale
- March 06, 2026
- 15 views
बेंगळुरू : कर्नाटक सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. असा निर्णय घेणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान ही माहिती दिली. मुलांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढत असून त्याचा त्यांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. या बंदीची अंमलबजावणी कशी करायची याबाबतची तयारी सुरू असून लवकरच यासाठी सविस्तर नियम जाहीर केले जाणार आहेत.
दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारही १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली.
शैक्षणिक संस्थांमध्ये अंमली पदार्थांवर कठोर कारवाई
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार आहे.
यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कडक नियम लागू केले जातील. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समुपदेशन आणि सहाय्य केंद्रेही उभारली जाणार आहेत.
वयाची पडताळणी बंधनकारक
१६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचा प्रस्ताव डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा २०२३ आणि माहिती संरक्षण नियम २०२५ यांच्याशी संबंधित आहे. या अंतर्गत सोशल मीडिया खाते तयार करताना पालकांची परवानगी आणि वयाची पडताळणी अनिवार्य केली जाऊ शकते.
यासाठी सरकारी ओळख प्रणाली किंवा डिजिटल लॉकरसारख्या डिजिटल साधनांचा वापर करण्याचा विचारही सरकार करत आहे.
