४ दिवसांत १२००+ उड्डाणे रद्द, सरकार बॅकफूटवर
- by Yogesh Bandagale
- December 05, 2025
- 57 views
नवी दिल्ली : सरकारने देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन कंपनी इंडिगोला रोस्टर (ड्यूटी चार्ट) नियमांमधून सूट दिली आहे. एअरलाइन शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी क्रू मेंबर्सच्या (पायलटसह इतर फ्लाइट स्टाफ) कमतरतेमुळे त्रस्त दिसली. यामुळे शुक्रवारी दिल्ली, बेंगळूरु, पुणे, हैदराबादसह अनेक विमानतळांवर 500 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत.
विमानतळावर परिस्थिती बिकट आहे. प्रवाशांना विमानांच्या उड्डाणांची माहिती मिळत नाहीये. पाणी, जेवण आणि आवश्यक वस्तूंसाठी लोक कर्मचाऱ्यांशी भांडताना दिसले. अनेक ठिकाणी मारामारीची परिस्थिती निर्माण झाली. अनेक विमानतळांवर लोक 24-24 तासांपासून विमानाची वाट पाहत आहेत. पायऱ्यांवर आणि खुर्च्यांवर बसून रात्र काढण्यास भाग पडले आहेत.
दिल्ली विमानतळावर इंडिगोची सर्व देशांतर्गत उड्डाणे आज रात्री 12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. गोवा विमानतळावर एका महिला प्रवाशाने सांगितले, 'आम्ही सकाळी 5 वाजेपासून वाट पाहत आहोत. विमानतळावर आल्यावर कळले की विमान रद्द झाले आहे. ना कोणताही मेल आला, ना मेसेज.'
