सावर्डे विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन शिबिर संपन्न

सावर्डे : समुपदेशन म्हणजे जीवनातील वादळातून योग्य दिशा दाखवणारी प्रकाशमय दीपमाळ होय, असे प्रतिपादन सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे दहावी  विद्यार्थ्यांसाठी  सर्वांगीण समुपदेशन शिबिरात, व्याख्याते समुपदेशक नारायण पाटील यांनी केले.या शिबिरात शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य या तीन महत्त्वाच्या घटकांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शारीरिक आरोग्याच्या समुपदेशनात ‘कायाकल्प’ या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांना संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व, जंक फूडचे दुष्परिणाम, नियमित व्यायाम, योगासने, खेळ तसेच वैयक्तिक व परिसर स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच किरकोळ दुखापतींवर प्रथमोपचार कसे करावेत याची माहिती देण्यात आली.
मानसिक आरोग्याच्या समुपदेशनात ‘मनःशांतीचा कल्पवृक्ष’ या विषयांतर्गत परीक्षेचा ताण, अभ्यासाचा दबाव, एकाग्रतेचा अभाव, नैराश्य व आत्मविश्वासाचा अभाव यांसारख्या समस्यांवर प्रभावी उपाय सुचविण्यात आले. वेळेचे नियोजन, सकारात्मक विचारसरणी, ध्यानधारणा व अध्ययन कौशल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात आला.
भावनिक आरोग्याच्या समुपदेशनात ‘संवेदनांचा सागर’ या शीर्षकाखाली राग, क्रोध, नातेसंबंधातील तणाव, अपयशाची भीती व टीका सहन करण्याची क्षमता यावर मार्गदर्शन करण्यात आले. सहानुभूती, संवादकौशल्य आणि भावनांचे योग्य व्यवस्थापन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
या समुपदेशन शिबिराची त्रिसूत्री म्हणून गोपनीयता, सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनकौशल्यांचा विकास यावर विशेष भर देण्यात आला. निर्णयक्षमता, समस्या निवारण व प्रभावी संवाद यांसारखी कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याचा उद्देश यामागे होता.
समुपदेशक नारायण पाटील यांनी विविध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा तसेच त्यांच्या आवडीनिवडींचा चिकित्सक अभ्यास केला. या उपक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
थोडक्यात, गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील हे समुपदेशन शिबिर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरले असून, त्यांना केवळ यशस्वी विद्यार्थीच नव्हे तर जबाबदार व सक्षम नागरिक घडविण्यास उपयुक्त ठरणारे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

संबंधित लेख