चिपळुणात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीचा विद्यार्थिनीवर हल्ला

चिपळूण : शहरातील पेठमाप तांबटआळी परिसरात गुरुवारी पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला केल्याने ती घाबरून पळताना रस्त्यालगतच्या गटारात पडून जखमी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी पहाटेच्या सुमारास शिकवणीसाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी परिसरात फिरत असलेल्या ५ ते ६ भटक्या कुत्र्यांनी तिच्या दिशेने धाव घेतली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती घाबरून पळू लागली. पळताना तिचा तोल जाऊन ती उघड्या गटारात पडली.

घटनेनंतर विद्यार्थिनीच्या आरडाओरडामुळे स्थानिक नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावत विद्यार्थिनीची सुटका केली. तिच्या हाताला व पायाला मार लागला असून तिला तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने गंभीर दुखापत टळली असल्याचे समजते.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पेठमाप तांबटआळी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अनेक वेळा पाठलाग करणे, लहान मुलांवर भुंकणे किंवा झुंडीने फिरणे असे प्रकार वारंवार घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिकांनी नगरपालिकेकडे तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि धोकादायक कुत्र्यांचे पुनर्वसन याबाबत प्रभावी कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित विभागाकडून घटनेची दखल घेण्यात आली असून लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित लेख